‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ मूल्यांकनाचे मराठी भाषेवर होणारे दुष्परिणाम आणि त्यांवरील उपाय
Published:
२०१० च्या दशकाच्या सुरुवातीला महाराष्ट्र शासनाने इयत्ता दहावीचे अंतिम मूल्यांकन करण्यासाठी “बेस्ट ऑफ फाइव्ह” पद्धती अंमलात आणली. या पद्धतीचे मराठी भाषा विषयावर आणि अर्थात मराठी भाषेवर होणारे दुष्परिणाम आणि त्यांवरील शक्य उपाय संबंधित लेखात नमूद करत आहे.
पार्श्वभूमी
‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ पद्धती – दहावीच्या गुणपत्रिकेवर अंतिम गुणांची टक्केवारी नोंदवताना ६ ग्राह्य धरल्या जाणाऱ्या विषयांपैकी सर्वाधिक गुण असणारे पाचच विषय पकडून टक्केवारी गणणे याला ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ अथवा मराठीत ‘सर्वोच्च पाच’ असे संबोधले जाते.
ही पद्धती महाराष्ट्र एसएससी बोर्डाने या करिता आणली की, जेणेकरून एसएससी बोर्डामध्ये शिकणारे विद्यार्थी इतर बोर्डाच्या शाळांमधून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत स्पर्धा करू शकतील. या पद्धतीमागची पार्श्वभूमी अशी की, अकरावीचे प्रवेश घेत असताना विद्यार्थ्याच्या बोर्डाकडे दुर्लक्ष करून केवळ त्याच्या गुणांची टक्केवारी पाहिली जाते. ही पद्धत आता काहीशी कालबाह्य जाणवते, आणि आपण याकडे या लेखाच्या शेवटी परतू यात.
एकूणात, ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ लागू होण्याआधी एसएससी बोर्डाच्या दहावी पास विद्यार्थ्यांना इतर बोर्डांच्या विद्यार्थ्यांपेक्षा सरासरी कमी टक्केवारी असायची आणि त्यांना बोर्डामध्ये उत्कृष्ट कामगिरी करूनही प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणे कठीण बनायचे. ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’चा एक चांगला परिणाम म्हणजे एसएससी बोर्डाची मुले मुंबई-पुण्यासारख्या महानगरांतील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यात आघाडीवर पोचली.
'बेस्ट ऑफ फाइव्ह'चे दुष्परिणाम
ही मूल्यांकन पद्धती लागू होण्याआधीच महाराष्ट्र बोर्डाने हळूहळू मराठी आणि इतर विषयांचा अभ्यासक्रम सोपा बनवण्यास सुरुवात केली. त्याचे कारण देखील हेच की SSC बोर्डाचा प्रथम क्रमांक घेणारा विद्यार्थी सुमारे ९०-९५% गुण मिळवून देखील CBSE/ICSE बोर्डामध्ये ९५+% मिळवणाऱ्या कित्येक साधारण विद्यार्थ्यांच्या मागे पडायचा. २००५ सालापर्यंत मराठी भाषा विषयाचा पेपर हा सर्वांमध्ये कठीण म्हणून वेगळा अभ्यासला जायचा. मराठी भाषेच्या बोर्डाच्या परीक्षेत पुष्कळ काही न पाहिलेले प्रश्न विचारले जायचे आणि केवळ सुंदर मांडणी व सुरेख हस्ताक्षर अशा गोष्टींना भाषेमध्ये नवनिर्माण करण्यापुढे मोल दिले जायचे नाही. मराठी विषय हा विज्ञान, गणित, इंग्रजी या विषयांपेक्षा अधिक चर्चेचा विषय असायचा. जीवनातली पहिली मोठी व्यक्तिनिष्ठ लेखी चाचणी!
या शैक्षणिक सौम्यकरणाने मराठी शिक्षणाची गेल्या काही दशकांमध्ये कठोर दैना केली आहे. त्यातही, “बेस्ट ऑफ फाइव्ह”मुळे मराठी भाषा अध्ययनावर आणखी विपरीत परिणाम होत आहे. मराठी हा मूलतः व्यक्तिनिष्ठ (subjective) पेपर असल्यामुळे त्यामध्ये गुण मिळवणे इतर पाच विषयांपेक्षा - गणित, विज्ञान, इंग्रजी, समाजशास्त्रे आणि द्वितीय भाषा (संस्कृत) - यांपेक्षा कठीण. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये, सहावा विषय म्हणुन मराठीचाच सर्रास बळी दिला. “बेस्ट ऑफ फाइव्ह”अंतर्गत दहावीच्या बोर्डमध्ये ९५% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मराठी हाच विषय गळाला जायचा कारण मराठी विषयात ९५+ गुण मिळवणारे संपूर्ण महाराष्ट्रातच बोटांवर मोजण्याइतके असायचे. कालांतराने मराठी विषयात गुण मिळत नाहीत असा ग्रह (सार्थ) बनून मराठी भाषेकडे विद्यार्थ्यांनी, पालकांनी, आणि शाळांनी देखील पद्धतशीर पणे त्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली.
यावर तोडगा म्हणून बोर्डाने मराठी पेपरसाठी नवीन धोरण राबवायला चालू केले आहे. नव्या धोरणात तृतीय भाषा इंग्रजी पेपरप्रमाणे प्रथम भाषा मराठीच्या पेपरमध्येदेखील उतारे वाचून विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचा मार्ग करून दिला आहे. जी भाषा दोन दशकांपूर्वी गांभीर्याने अभ्यासली जायची ती पैकीच्या पैकी गुण मिळवून महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी म्हणून पद्धतशीरपणे दुर्लक्षित करण्यात आली.
अशाप्रकारे ज्या शासकीय व्यवस्थेकडून भाषेच्या अभिवृद्धीसाठी काम होणे अपेक्षित आहे तिच्या आणि मराठी समाजाच्या (स्वतःला समाविष्ट करून) दुर्लक्षामुळे आज आपल्या भाषेचा ऱ्हास होताना पहावा लागतोय.
उपाय
या लेखाचा हेतू केवळ भय पसरवून कलह घडवून आणणे हा मुळीच नाही. त्यामुळे उपाय सुचवणे क्रमप्राप्त होय. तो पुढील प्रमाणे:
माझ्यामते इतर बोर्डांबरोबर स्पर्धा व्हावी आणि आपण पुढे असावे म्हणून शैक्षणिक सौम्यकरण, “बेस्ट ऑफ फाइव्ह”, उतारांवरील प्रश्न हे अतिशय चुकीचे तोडगे आहेत. बोर्डांच्या गुणांची तुलना करणे हा प्रश्न काही वर्षांपूर्वी JEE Mains परीक्षा समितीलादेखील पडला. त्यावेळी, त्यांनी विद्यार्थ्याच्या शतकांश (percentile) वर आधारित गुण सामान्यीकरण (normalization) सूत्र बनवले आहे. समजा महाराष्ट्र HSC बोर्डामध्ये तुम्ही पहिल्या १० जणांमध्ये असाल आणि CBSE मध्ये पहिल्या १० जणांमध्ये असाल तर अभ्यास क्रमांची तुलना, परीक्षांची कठिणता, विद्यार्थ्यांची एकूण शैक्षणिक कुवत, आदि. महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन त्या २० जणांची एकाच क्रमावर यादी बनवली जाते. हे सूत्र सर्वांसमोर आधी प्रसिद्ध करून अम्मलात आणल्यामुळे बनलेल्या यादीवर एकप्रकारचे एकमत बनवणे अतिशय सहज बनते. अशीच पद्धत अकरावी प्रवेशासाठी लागू केल्यास SSC बोर्डाला इतर बोर्डांबरोबर स्पर्धा करण्यासाठी शैक्षणिक सौम्यीकरण करण्याची गरज पडणार नाही. इतकेच नव्हे, तर जे वलय बोर्ड परीक्षांना २ दशकांपूर्वी होते तेच पुन्हा प्राप्त होईल. मराठी भाषा वृद्धीसाठी तिचे अध्ययन आणि अध्यापन गांभीर्याने होणे महत्त्वाचे. बोर्डांच्या गुणांचे शतकांश पद्धतीने सामान्यीकरण करणे हे महत्त्वाचे पाऊल ठरेल.